भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसने करून घेतला पाहिजे; तुषार गांधी

भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसने करून घेतला पाहिजे; तुषार गांधी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : भारताच्या चलनावर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र ज्याप्रकारे या चलनाचा वापर होतो ते गांधीच्या तत्वा विरोधात आहे. आज पैशाचा फायदा श्रीमंतांना होतो गरिबांना नव्हे त्यामुळे नोटेवर गांधी नसावेत असे आपले ठाम मत असल्याचे महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी सांगितले. याचवेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा सर्वदूर पसरली असून पक्ष त्याचा फायदा कसा करून घेणार हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डोंबिवलीत हेल्पिंग हॅण्ड या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात आलेल्या तुषार गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात राबविलेला भारत जोडो यात्रा हा आवश्यक उपक्रम होता. त्यातून खूप चांगला संदेश समाजात पोचला असून पक्ष या संधीचाफायदा कसा करून घेतो हे पाहणे गरजेचे आहे. मात्र यातून मिळालेले यश कशा प्रकारे पक्षाकडून व्यापक बनवता येते यावर यात्रेचे भवितव्य अवलंबून असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

त्यांना अदानी संदर्भात विचारले असता त्यांनी देशात न्यायतंत्र असेल तर त्यांनी देशातील न्यायाप्रमाणे वागले पाहिजे सरकार वर टीका करण्यापेक्षा न्याय प्रणालीने आपली स्वतंत्रता दाखविण्यासाठी त्यांना गुन्हे प्रवृत्ती दिसत असेल तर त्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

पुतळ्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना त्यांनी पुतळ्याच्या राजनीती मध्ये थोडे देखील स्वारस्य नसल्याचे म्हटले. कारण पुतळे बनवणारा आणि ते लावणारा हे दोघेही जण आपला अहंकार प्रदर्शित करण्यासाठी पुतळ्याचे राजकारण करत असतात ज्यांची प्रतिमा लावली जाते. त्याना त्याचा काहीच फरक पडत नाही.

तर महापुरुषांवर केल्या जाणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी प्रत्येकाने महापुरुष वाटून घेतले असून स्वताच्या महापुरुषाची स्तुती करून दुसऱ्याच्या महापुरुषावर टीका करणे म्हणजे महापुरुषावर अन्याय करत असून हा केवळ राजनीतीचा प्रकार आहे. वास्तविक नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकार केले जात असून सामान्य माणसाना भेडसावणारे प्रश्न त्यांनी कायमच दुर्लक्षित केल्यानेच त्यांना अशा प्रकारे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी महापुरुषांचा आधार घ्यावा लागत असल्याचे सांगितले.

देशभरात तिरंगा फडकविण्याच्या पंतप्रधानाच्या आदेशाचा समाचार घेताना त्यांनी राष्ट्रभक्तीचा दंभपणा असल्याचे मत मांडले. एक दिवशी तिरंगा ठेवायचे आणि त्यानंतर तिरंग्याची अवस्था काय होते त्याकडे दुर्लक्ष करायचे, त्यापेक्षा आपल्या वृत्तीत, कार्यात जीवनात आपण देशाचे हीत किती करतोय, नुकसान किती करतोय याची जाणीव असणे हीच प्रकट राष्ट्रभक्ती असेल असे ते म्हणाले. गांधी गोडसे चित्रपटावरून लक्ष विचलित करण्यासाठी पठाण चित्रपटाचा वाद निर्माण करण्यात आल्याचे मत त्यांनी मांडले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news