कल्याणच्या रेल्वे लोको शेडमध्ये घुसला कोब्रा; तर बांबू हॉटेलमध्ये विषारी घोणस पाहून ग्राहकांनी काढला पळ

कोब्रा
कोब्रा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा;  कल्याणच्या रेल्वे स्थानकानजीक असलेल्या लोको शेडमध्ये शेकडो कामगार इंजिनची दुरुस्ती करत असतानाच एक आक्रमक कोब्रा दिसला. त्‍यामुळे या कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली. यावेळी काम बंद करून या कामगारांनी लोको शेडबाहेर पळ काढला. तर बांबू हाऊस नावाच्या हॉटेलमध्ये विषारी घोणस घुसल्याने ग्राहकांसह वेटरांनी पळ काढला. या दोन्ही सापांना पाहून बघ्यांची पुरती हवा टाईट झाली होती.

कल्याण रेल्वे लोको शेडमध्ये दिवस-रात्र इंजिन आणि डब्यांच्या दुरुस्तीचे काम शेकडो कामगारांकडून सुरु असते. त्यातच रात्र पाळीत कामगार काम करत असताना भक्ष्याच्या शोधात कोब्रा लोको शेडमध्ये शिरला. त्यावेळी एका कामगाराला भिंतीच्या पाईपवर कोब्रा फणा काढून बसलेला दिसला. लोकोशेडमध्ये नाग घुसल्याची आरडा-ओरड करताच सर्व कामगारांनी काही काळ काम बंद करून या नागाच्या भीतीने पळ काढला.

तर कमलाकर सूर्यवंशी नावाच्या कामगाराने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून लोको शेडमध्ये नाग शिरल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे हे घटनास्थळी दाखल होऊन या नागाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. आक्रमक पवित्रा घेतलेल्या या कोब्र्याला जेरबंद केल्याचे पाहून कामगारांनी सुटकेचा निश्व:स सोडला. हा नाग साडेतीन फूट लांबीचा आहे.

दुसऱ्या घटनेत विषारी घोणस कल्याण पश्चिम भागातील गांधारी पुलालगत असलेल्या बांबू हाऊस नामक हॉटेलमध्ये घुसला. रात्री हॉटेलमधील सर्वच टेबलवर मेजवानीसाठी ग्राहक बसले होते. त्याच सुमारास एक चट्ट्याबट्ट्याचा साप तेथील ग्राहकाला दिसला. त्याने हॉटेलमध्ये साप शिरल्याची माहिती दिली. वेटरने हा साप विषारी असल्याचे सांगतच सर्वच ग्राहकांनी मेजवानी सोडून हॉटेलबाहेर पळ काढला.

त्यानंतर हॉटेल मालकाने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करून हॉटेलमध्ये विषारी साप शिरल्याची माहिती दिली. काही वेळाने सर्पमित्र बोंबे हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी या विषारी घोणसला एका टेबलाखालून पकडून पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून मालक, वेटरसह ग्राहकांनी सुटकेचा निश्व:स सोडला. दरम्यान या दोन्ही विषारी सापांना कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान देण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news