ठाणे: सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ७ दरोडेखोर जेरबंद | पुढारी

ठाणे: सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ७ दरोडेखोर जेरबंद

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा: मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली रेल्वे स्टेशन भागात सोमवारी रात्री पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. दरोडा टाकण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ७ जणांच्या टोळीला रामनगर पोलिसांनी पाठलाग करून प्राणघातक शस्त्रांसह जेरबंद केले. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून म्हसोबानगर झोपडपट्टीतून 90 फुटी रस्त्याकडे पायी जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना लुटणे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेत दरोडा टाकण्याच्या निमित्ताने ही टोळी एकत्र आली होती. मात्र, पोलिसांनी या टोळीचा मनसुबा उधळून लावला.

या टोळीमध्ये 16 वर्षाच्या दोन अल्पवयीन तरूणचाही समावेश आहे. हे सर्व बदमाश डोंबिवली, ठाकुर्लीतील खंबाळपाडा, चोळेगाव, शेलार नाका, म्हसोबानगर झोपडपट्टीत राहणारे आहेत.

सागर उर्फ मुन्ना शंभु शर्मा (वय 19, रा. दिनेशनगर चाळ, खंबाळपाडा, ठाकुर्ली), जेम्स गांधी सुसे ( वय 24, रा. म्हसोबानगर, आंबेडकर पुतळ्याजवळ, ठाकुर्ली), सत्यकुमार मुकेश कनोजिया (वय 19, रा. नेवाळी चौक, हेमंत पाटील चाळ, नेवाळी गाव), सचिन उर्फ पिल्लु उमाशंकर राजभर (वय 21, रा. म्हसोबानगर, चोळेगाव), सोनु मदन कनोजिया (वय 19, रा. व्हिलेज गार्डन ढाब्याच्या समोर, समीर पेपर मार्टजवळ, चोळेगाव), तर दोन अल्पवयीन बदमाश त्रिमुर्तीनगर (शेलारनाका) आणि खंबाळपाडा भागात राहणारे आहेत.

रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश सानप, विशाल वाघ, शंकर निवळे आणि प्रशांत सरनाईक हे पथक सोमवारी रात्रीच्यावेळी ठाकुर्ली, चोळेगाव, 90 फुटी रस्ता भागात दुचाक्यांवरून सोमवारी रात्री गस्त घालत होते. या पथकाला 90 फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकातील अंधारात तरुणांचे एक टोळके थांबलेले दिसले. पोलिसांना पाहून या टोळक्याने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी थरारक पाठलाग करत या सर्व बदमाश्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या टोळक्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ वाटमाऱ्या आणि दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे हस्तगत करून सातही बदमाश्यांना जेरबंद केले.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरून अनेक प्रवासी रात्रीच्या वेळेत रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या झोपडपट्टीच्या मार्गाने काळोखातून 90 फुटी रोडवरून येतात. दबा धरून बसलेल्या या टोळक्याकडून अशा प्रवाशांना अडवून त्यांची लूट करण्याचा इरादा असल्याचे तपासात उघड झाले आहे. रात्रीच्या वेळेत जमावाने जमण्यास ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशाचा भंग दरोडेखोरांच्या या टोळीने केला आहे. त्यामुळे या टोळीविरुध्द पोलिसांनी दरोडा आणि लुटमारीचा इरादा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या टोळीने आतापर्यंत या भागात किती चोऱ्या, वाटमाऱ्या, दरोडे आणि लुटमारीचे गुन्हे केले आहेत, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे या टोळीत अल्पवयीन तरुणांचा समावेश असल्याचे आढळून आल्याने तपास यंत्रणाही अवाक् झाली. आपली व्यसने, मौज-मज्जा पूर्ण करण्यासाठी युवा पिढी गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button