भिवंडी : पुढारी वृत्तसेवा घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी
आरोपीस पकडून 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 21 ऑगस्ट रोजी हेमल पटेल यांच्या मालकीच्या गोदामाचे शटर अज्ञात चोरट्याने तोडून 9 लाखांचा अल्युमिनियम सेक्शन (पट्टी) चा माल चोरून नेला होता.
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता, घटनेनंतर गोदामात काम करणारा कामगार अखिलेश राजभर कामावर येत नसल्याचे कळाले. त्यामुळे नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांनी सपोनि डी. डी. पाटील, भरत नवले, पोह भगवान चव्हाण,हरेश म्हात्रे,पोना लक्ष्मण सहारे, सुनिल शिंदे, पोशि योगेश क्षीरसागर या पोलीस पथकासह तपास सुरू केला होता.
दरम्यान पोऊनि रोहन शेलार यांना गुप्त बातमीदारामार्फत अखिलेश राजकुमार राजभर (22) भिवंडीत असल्याची खबर मिळाल्याने त्यांनी शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 9 लाख 13 हजार 681 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 29 ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे.