मिठाई खरेदी करताना बेस्ट बिफोर नक्की पाहा | पुढारी

मिठाई खरेदी करताना बेस्ट बिफोर नक्की पाहा

ठाणे : अनुपमा गुंडे कोरोनाची दहशत कमी झाल्याने यंदा सण उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सवात बाप्पाला अर्पण करण्यात येणारा मोदक किंवा तत्सम मिठाईरूपी प्रसादात विविध प्रकारच्या पदार्थांना आणि मिठाईला मागणी असते, मात्र कच्च्या किराणा मालाच्या पदार्थात भेसळ तर नाही ना, या खात्री बरोबरच प्रसाद म्हणून घेण्यात येणार्‍या दुग्धजन्य व अन्य मिठाई विकत घेतांना ती मिठाई किती कालावधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहे (बेस्ट बिफोर) याची माहिती ग्राहकांनी नक्की घ्यावी, असे आवाहन अन्न प्रशासनाने केले आहे.

मिठाई विकतांना किती कालावधीसाठी खाण्यायोग्य नाही, (बेस्ट बिफोर) नमूद न केल्याबद्दल अन्न प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील मीरा – भाईंदर मधील दोन मिठाई विक्रेत्यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. सणासुदीचे दिवस लक्षात घेता किराणा माल, मिठाईच्या पदार्थांची वाढती मागणी असल्याने त्यात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राहकांना निर्भेळ व दर्जेदार अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रामुख्याने मिठाई उत्पादक व विक्रेते यांचे सखोल, सविस्तर व वस्तुनिष्ठ तपासणी करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

गणेशोत्सवाच्या काळात मिठाईची वाढती मागणी लक्षात घेवून विविध प्रकारच्या मिठाईचे उत्पादन, वितरण व विक्री करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचे सह विविध प्रकारच्या मिठाईचे उत्पादक, साठवणूकदार, वाहतूकदार आणि किंवा विक्रेत्यांनी स्वच्छतेचे कोणते निकष पाळावेत, याबाबत अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी आपआपल्या विभागात कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केल्याची माहिती त्यांनी दिली.

अन्न प्रशासनाने कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अन्न पदार्थांच्या केलेल्या तपासणीत मोहिमेत एप्रिल 2021 ते मार्च 2022 अखेर 99 प्रकरणांत सुमारे 4 कोटी 10 लाखांचा माल जप्त केला आहे. चालू वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान केलेल्या खाद्य पदार्थ तपासणी मोहीमेत 86 लाख 58 हजारांचा अन्न पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती
देशमुख यांनी दिली.

टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा

सध्याचे व आगामी सणासुदीचे दिवस विचारात घेऊन सुरक्षित खाद्यतेल उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ऑगस्टमध्ये खाद्यतेलाच्या अनुषंगाने कोकण विभागात विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध ब्रँडच्या खाद्यतेलाचे-वनस्पतीचे एकूण 66 नमुने घेण्यात आलेले होते. सदरचे सर्व नमुने चांगल्या दर्जाचे-मानदाप्रमाणे असल्याबाबतचा अन्न विश्लेषकांनी अहवाल दिलेला आहे. मिठाईवर बेस्ट बिफोर तारीख नमूद नसल्यास ग्राहकांनी 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन अन्न प्रशासनाने केले आहे.

मिठाई विक्रेत्यांनी, उत्पादकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी आम्ही कोकण विभागातील महानगरांबरोबरच, ग्रामीण भागातही कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले आहे. मिठाईवर बेस्ट बिफोरची तारीख नमूद न केल्याबद्दल मीरा रोड पूर्व येथील जोधपूर स्वीट अ‍ॅण्ड नमकीन तसेच श्री आईमाता स्वीट्स या दोन मिठाई विक्रेत्यांना प्रत्येकी 25 हजारांचा असा 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
– सुरेश देशमुख, सह आयुक्त, अन्न प्रशासन -कोकण विभाग

Back to top button