शिंदे गटाचे कार्यालय ठाण्यातील आनंदाश्रमात! | पुढारी

शिंदे गटाचे कार्यालय ठाण्यातील आनंदाश्रमात!

ठाणे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील ठाकरे आणि शिंदे गट शिवसेना आमचीच असल्याचे सांगत असताना मध्यवर्ती कार्यालय कोणते असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शिंदे गटाने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय हे ठाण्यातील आनंदाश्रममध्ये निश्चित केले आहे. तसा पत्ता त्यांच्या लेटरहेडवर नमूद करण्यात आला आहे.

शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यावर चार आठवड्यांनंतर सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय कोणाच्या ताब्यात राहील, शिंदे गटाचे पदाधिकारी कुठे बसणार आणि त्यांच्या नवीन नेते, पदाधिकारी यांच्यानियुक्त्या कशा होतील, आदी प्रश्न उपस्थित केले जात होते.

प्रत्येक वॉर्ड, विधानसभानिहाय कार्यालय सुरू करण्याचा मानस शिंदे गटाने आखला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. शाखा कुणाच्या यावर हाणामारीही झाल्या आहेत. यातून कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय हे बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्या कार्यालयातून शिवसेनेचा प्रचार, प्रसार आणि सत्ताकारण केले, त्या श्री भवानी चौकातील आनंदाश्रम हे मध्यवर्ती कार्यालय म्हणून निश्चित केले आहे.

Back to top button