ठाणे : घरांची विक्री करणारी महिला गजाआड | पुढारी

ठाणे : घरांची विक्री करणारी महिला गजाआड

नेवाळी : पुढारी वृत्तसेवा नेवाळीमध्ये चाळींमधील घर दाखवून त्यांची परस्पर विक्री करणारी महिला अखेर गजाआड झाली आहे. अंबरनाथमध्ये राहणार्‍या अब्दुल बाबू शेख याला सात लाखात घर देत असल्याचे सांगून त्याच्याकडून तीन लाख रुपये या महिलेने घेतले होते. मात्र अब्दुल घर पाहण्यासाठी गेला असता त्या घराचे मालक अन्य असल्याचे समजताच अब्दूलने हिललाईन पोलिसात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी देखील तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. फरार असलेल्या या लेडी बिल्डरला आडीवली येथून हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. नेवाळीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चाळींची कामे सुरु आहेत. मात्र याच चाळींमध्ये अनेक गोरगरिबांची बोगस बिल्डर फसवणूक करत असल्याचे देखील समोर आले आहे. अंबरनाथमध्ये राहणार्‍या अब्दुल बाबू शेख याने नेवाळीमधील ओम साई नगर चाळीत गुडिया तानाजी पाटील हिच्याकडून सात लाखांमध्ये चाळींमधील घर विकत घेतले होते.

घर विकत घेत असताना त्याने आपल्या कडून तिन लाख रुपये देखील घराची पाहणी केली होती. मात्र या घरात बिल्डर महिला भाडेकरू असल्याचे समजताच अब्दुल याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुडिया या महिला बिल्डरने पोलिसात हे प्रकरण जाऊ नये यासाठी अब्दुलला चेकच्या स्वरूपात पैसे परत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नोटरीवर केलेला साठे करार आणि झालेले चेक बाउन्स तक्रार मागे घेण्यासाठी येणार्‍या धमक्या लक्षात घेता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर हिल लाईन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ यांनी आडीवली येथून अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक
तपास करत आहेत.

Back to top button