ठाणे : बदलापूरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तंग | पुढारी

ठाणे : बदलापूरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तंग

बदलापूर : पुढारी वृत्तसेवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा प्रकार बदलापुरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. परंतु गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असताना घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री बाराच्या सुमारास बदलापूर पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात बदलापूर गावातील कैफ शेख (26) याच्या गाडीवर गोळीबाराची ही घटना घडली आहे. याप्रकरणी अमन सिंग, सचिन खंडागळे उर्फ टकल्या, पाठक बिल्डर, शेखर गडदे, राऊत्या, लक्ष्मण नवघिरे व त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी कैफ याच्या दिशेने गोळीबार केला. तसेच त्याच्या गाडीवर तलवार, दांडके व रॉडने हल्ला करत गाडीचे नुकसान करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यापैकी चार जणांना जणांना अटक करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी सचिन खंडागळे व अमन सिंग याचा भाऊ अभिषेक सिंग यांच्याविरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली होती. याबाबतची माहिती कैफ याने दिल्याचा समज करून व त्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती दत्ता गावडे यांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांकडून 1 रिव्हॉल्व्हर व 1 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यातही यश आले आहे.

Back to top button