ठाणे : शेकडो पोलीस कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

ठाणे : शेकडो पोलीस कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

ठाणे : संतोष बिचकुले सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात पोलिसांना हक्काचे घर स्वस्त दरात मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली. मात्र सध्या आहे त्या माहीम पोलीस वसाहतीमधील घरांमध्ये राहणे पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना मुश्कील झाले आहे. कोणीच लक्ष देत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ व उग्र वासाचे पाणी उकळून पिण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर आली आहे.

लोकांसह नेतेमंडळींच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम सतर्क असतात. प्रसंगी कर्तव्यापलीकडे जाऊन लोकहित जपतात. अशाच प्रकारे कर्तव्य बजावणार्‍या माहीम वसाहतीत इमारत क्र. 4 मध्ये राहणार्‍या पोलिसांच्या वाट्यालाच मात्र संकट आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या इमारतीमध्ये उग्र वासाचे गढूळ पाणी नळावाटे येत आहे. रोज पाणी विकत घेऊन पिणे परवडत नसल्याने या इमारतीत 90 हून अधिक कुटुंबियांना गढूळ पाणी उकळून प्यावे लागत आहे.

मुख्य जलवाहितून पाणीपुरवठा करणारी जमिनीखालील पाईप लाईन फुटल्यामुळे गढूळ पाणी येत असल्याचे पोलीस कुटुंबियांचे म्हणणे आहे. या गैरसोयीबाबत पीडब्ल्यूडी विभागातील तक्रारवहीत अनेकदा नोंद करण्यात आली आहे. मात्र यावर गांभीर्याने कार्यवाही करण्यात आलेली नाही. पीडब्ल्यूडीकडून केवळ थातूरमातूर दुरस्ती केली जात आहे. तसेच इमारतीच्या पायर्‍यांवरील सिमेंट व विद्युत मीटर बॉक्सची दुरवस्था असून त्यात कचर्‍याचा ढीग आहे. तेथे कोणीच सफाई करत नाही, अशी माहिती रहिवाशांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दै. ‘पुढारी’ला सांगितली

पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार प्रत्येक पोलीस वसाहतीची दुरुस्ती व देखभालीचे काम पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग) विभागाकडे आहे. माहीम पोलीस वसाहतीचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेले दिलीप खेडकर हे दोन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. तरीही देखील त्यांच्या हाती कारभार आहे. शासनाकडून सेवानिवृत्ती झालेल्यांच्या जागी नव्याने नियुक्ती केली जात नाही. तसेच खेडकर अनेक दिवसांपासून तेथे कार्यरत असल्याने त्यांना तेथील कामकाजाची सर्व माहिती असल्याने त्यांनाच कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आल्याची माहिती पीडब्ल्यूडीचे धनंजय व्यवहारे यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.

Back to top button