डोंबिवली : केडीएमसीच्या तोतया अधिकार्‍याला उल्हासनगरातून अटक | पुढारी

डोंबिवली : केडीएमसीच्या तोतया अधिकार्‍याला उल्हासनगरातून अटक

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात एका ज्येष्ठ नागरिकाला तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान का करता, असे प्रश्न करत एका तोतया कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकार्‍याने ज्येष्ठ नागरिकाकडून दमदाटी करुन 7 हजार 600 रुपयांची लूट केली होती. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. टिळकनगर पोलिसांनी ठाकुर्ली 90 फुटी रस्ता, ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी सोमनाथ कांबळे (27) याला उल्हासनगर येथून अटक केली.

ठाकुर्ली भागातील एक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर एका खासगी कंपनीत नोकरीला जातात. गेल्या महिन्यात रस्त्याने जात असताना ते धुम्रपान करत होते. त्यावेळी त्यांना समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोन जणांनी अडविले. आम्ही कल्याण-डोंबिवली पालिकेचे अधिकारी आहोत. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान कसे काय करता? कायद्याने हा गुन्हा आहे, तुम्ही कायद्याचा भंग केला आहे, म्हणून तुम्ही आमच्या सोबत पोलीस ठाण्यात चला, असे चढ्या आवाजात बोलून ज्येष्ठ नागरिकाला घाबरविले. तुम्हाला तात्काळ दंड भरावा लागेल, तुमच्या खिशात किती पैसे आहेत ? असे विचारुन ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील पाकिटातून त्यांचे बँक डेबीट कार्ड काढून घेतले होते.

पोलिसांचे आवाहन

आम्ही पोलिस किंवा पालिका अधिकारी आहोत, असे सांगून कुणी पादचार्‍याला लुटत असेल तर त्यांनी तातडीने संबंधित इसम अधिकारी आहेत का ? याची तपासणी करण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.

Back to top button