75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मोफत एस.टी प्रवास; आरक्षण केलेल्यांना मिळणार परतावा | पुढारी

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मोफत एस.टी प्रवास; आरक्षण केलेल्यांना मिळणार परतावा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा 75 वर्षे व त्यावरील ज्येष्ठांना राज्य शासनाने लागू केलेल्या मोफत एस. टी. प्रवास (अमृत ज्येष्ठ नागरिक) योजनेला शुक्रवार (26 ऑगस्ट) पासून प्रारंभ झाला. 26 ऑगस्ट पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या व 26 ऑगस्टपासून प्रवास करणार्‍या नागरीकांना तिकिटाचा परतावा दिला जाणार आहे. मात्र, सदरची सवलत शहरी बसेसकरीता लागू होणार नाही, तसेच ही प्रवास सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत लागू असेल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला.

राज्य शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवामधून 50 टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या प्रवास सवलतीसाठी ज्येष्ठांनी प्रवासात आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र सोबत बाळगावे, तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. सवलत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंतच 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना सवलतीच्या दरातील तिकिट घेता येईल.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेची प्रवासी सवलत शहरी बसेसकरीता लागू होणार नाही, तसेच सदर सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत असेल, असे चन्ने यांनी स्पष्ट केले. 26 ऑगस्ट च्या पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या परताव्यासाठी जवळच्या आगारात, बसस्थानकावर तिकिटासह अर्ज व वयाच्या पुराव्याची प्रत सादर करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Back to top button