आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीला शिंदे, ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन | पुढारी

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीला शिंदे, ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही, मात्र हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे, त्यामुळे ते टिकणारच असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. काही लोकांना ते हजम होत, नाही घशाखाली उतरत नाही की एकनाथ शिंदे कसा हा डोलारा सांभाळतील मात्र बाळासाहेब ठाकरे आणि या आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून दोन महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचा अजेंडा काहीच नाही, सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सरकार टिकणार, कारण हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे -मुख्यमंत्री

आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्तीस्थळी येऊन त्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना विरोधकांचाही समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघे साहेब आपल्यात शरिराने नसले तरी मनाने आपल्या सोबत आहेत. त्याची प्रचिती येते. जिल्ह्यात त्यांनी अलौकिक कार्य केले. त्यांच्यावरील सिनेमात त्यांचा सर्व जीवनपट उघडू शकत नाही. त्यांचा त्याग आपण पहिला. बाळासाहेबांचे हिंदुत्व त्यांनी पोचवले आणि त्याची पोचपावती जनतेने दिली.

हितचिंतक आणि राजकारणी लोकांना त्यावेळी धास्ती वाटली. मात्र लढाई साधी नव्हती, पण जिंकलो. दिघेंचं स्वप्न होत की ठाण्याच्या मुख्यमंत्री होईल आणि ते स्वप्न पूर्ण झाले असल्याचे ते म्हणाले. मला अभिमान आणि समाधान आहे माझ्या गुरूच्या आशीर्वादाने पल्ला गाठला. या सरकारने दिड महिन्यात ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मोठ्या निर्णयांची जंत्री आहे असल्याचे त्यांनी सांगितले. आजही काही लोकं म्हणतात हे सरकार राहणार नाही मात्र सरकार लोकांचे आहे, कोणाला ते हजम होत नाही घशाखाली उतरत नाही. एकनाथ शिंदे कसा डोलारा सांभाळतील, अशी धास्ती अनेकांना होती. मात्र आपल्या पोटात आणि ओठात एकच आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठीच काम करेल. सर्वसामान्य जनतेला न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा वारसा कोण नेतोय हे जनता दाखवेल -विचार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा खरा वारसा कोण पुढे नेत आहे, हे जनताच निवडणुकीतून दाखवुन देईल, असे खुले आव्हान खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शक्ती स्थळावर आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी राजन विचारे तसेच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर या ठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत महिला आघाडी प्रमुख अनिता बिर्जे देखील उपस्थित होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पकड असून आता या ठिकाणी ठाकरे गटाच्या माध्यमातुन खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकनाथ शिंदे हे शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येण्यापूर्वी खासदार राजन विचारे आणि दिघें यांचे पुतणे केदार दिघे यांनी या ठिकाणी येऊन आनंद दिघे यांना अभिवादन केले. यावेळी त्यानी शिंदे गटावर त्यांनी वरील टीका केली.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याचा विकास झाला आहे. त्यामुळे विकास कोणाच्या नेतृत्वाखाली झाला आहे हे पाहणे देखील महत्वाचे आहे.शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगितले जात असले तरी आनंद दिघे कोणाच्या हृदयात आहेत ते लवकरच समजेल. नुसता फोटो लावून होत नाही फोटो हे काल्पनिक असतात. मात्र खरा वारसा कोण पुढे नेत आहेत हे लवकरच जनताच निवडणुकीत दाखवुन देईल, असे खुले आव्हानच त्यांनी शिंदे गटाला यावेळी दिले.दरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटांमुळे शिवसैनिकांनी नक्की कोणती वाट धरावी असे अनेक प्रश्न अधांतरीच आहे.

Back to top button