ठाणे महापालिका : ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

ठाणे महापालिका : ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
Published on
Updated on

ठाणे महापालिका माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अधिकारी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. अतिशय वाईट पद्धतीने हा हल्ला पिंपळे यांच्यावर करण्यात आला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या एमएमआर रिजनमधील सर्व महापालिका आणि नगर पालिकांमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग एक दिवस काम बंद अंदोलन करणार आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला. एमएमआर रिजन मधील महापालिका आणि नगरपालिकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या ४० हजारांच्या घरात असून यामुळे कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले असल्याची भावना या बैठकीत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षावर सोमवारी कासारवडवली येथे एका फेरीवाल्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी पिंपळे यांची दोन बोटे अक्षरशः तुटून खाली पडली तर त्यांच्या अंगरक्षकांचेही एक बोट तुटून खाली पडले. या घटनेचे तीव्र पडसाद अधिकारी वर्गामध्ये उमटले असून मंगळवारी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

एका महिला अधिका-यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिका-यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती – पत्नी एकत्रीकरणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल? याचा सुध्दा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे असे मत संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख आणि आणि सरचिटणीस प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल शासन स्तरावर घेण्यासाठी उद्याचा हा एक दिवस बंद पुकारण्यात आला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन

ठाणे महापालिका माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना आणि महिला अधिकाऱ्यांच्या संघटनेने अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिले आहे. शासन याची गंभीर दखल घेऊन न्याय देईल अशी अपेक्षा यावेळी अधिकारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्याचा संघटीत निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावर योग्य उपाय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

फास्ट ट्रॅकवर खटला चालावा

अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी देखील यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. घटनेने आम्हाला इतर व्यक्तींना अधिकार दिले आहे त्याच दृष्टीने अधिकाऱ्यांना देखील वागणूक मिळावी आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील यावेळी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

संघटनेत महिला अधिकाऱ्यांना महत्वाची पदे द्या

महिला आणि पुरुष अधिकारी हे बरोबरीने काम करत असले तरी, महिला अधिकाऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरुष संघटनेच्या माध्यमातून ते मांडावे लागतात. त्यामुळे राज्य अधिकारी संघटनेमध्ये महिला अधिकाऱ्यांना देखील महत्वाची पदे देण्यात यावी अशी मागणी यावेळी तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी केली.

"हा अतिशय भ्याड हल्ला असून ही घटना अतिशय निंदनीय आहे . यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनुभव अधिकाऱ्यांना आले आहेत. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन स्तरावर तात्काळ आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याबरोबरच अधिकाऱ्यांचे मनोबल कमी होणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवे"

– वैदही रानडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, ठाणे

"अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्तींसोबत काम करावे लागते. यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बरोबर आता कार्यालयीन अधिकाऱ्यांवरही अशा प्रकारचे हल्ले होऊ लागले आहेत. जोपर्यंत शासन स्तरावर यावर योग्य कारवाई होणार नाही तोपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणार नाही"

– ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, भिवंडी महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news