दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची प्रकृती बिघडली | पुढारी

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची प्रकृती बिघडली

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याची प्रकृती बिघडली असून त्यास रेग्युलर चेकअपसाठी जेजे रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जीवे ठार मारण्याची धमकी तसेच खंडणीच्या गुन्ह्यात इकबालला ठाणे पोलिसांनी अटक केली असून तो सध्या ठाणे कारागृह शिक्षा भोगत आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ इक्बाल कासकर याच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोन तर कासारवडवली पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. याच दरम्यान इक्बालवर ठाणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतगत देखील कारवाई केली.

ठाणे कारागृहात असलेल्या कासकरला आजार जडल्याचा दावा करीत त्याच्या वकिलांनी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी ठाणे सत्र न्यायालयाकडे अर्ज करून मागितली होती. इकबालच्या वकिलांनी जेजे किंवा सेंट जॉर्जमध्ये उपचाराची परवानगी मागितली होती. त्यानुसार, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला तसे आदेश दिले होते. परंतु, शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्याने कारागृह अधिकार्‍यांनी इकबाल याला जेजे रुग्णालयात दाखल केले आहे.

वैद्यकीय उपचार नेहमीच वादाच्या भोवर्‍यात

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने 19 सप्टेंबर 2017 रोजी ठाणे पोलिसांनी नागपाडा येथून अटक केली होती. तेव्हापासून कासकर ठाणे तुरुंगात असून त्याच्या विरोधात मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अटक करण्यात आल्यापासूनच कासकर सारखी वैद्यकीय उपचार हवेत अशी मागणी लन्यायालयासमोर करीत आहे.

कधी पाय दुखतोय तर कधी दाढ दुखतेय अशी वारंवार दुखादुखीची कारणे कासकर व त्याचे वकील न्यायालयासमोर मांडत आहेत. दरम्यान, कासकर याचा वैद्यकीय उपचार नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडला असून मध्यनंतरी आपल्याला दाढ दुखीचा त्रास होत असून त्यावर उपचार मिळावेत अशी मागणी कासकर याने ठाणे तुरुंगात केली होती.

इक्बालची दाढ दुखत असल्याने त्याच्या दातांची तपासणी आणि उपचारासाठी न्यायालय आणि जेल प्रशासनाने मुभा दिली होती. त्यानुसार कासकर याला वैद्यकीय उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते.

कारागृहाच्या मागणीनुसार ठाणे पोलीस मुख्यालयातून कासकरला रुग्णालयात नेण्यासाठी पाच पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.

दातांची तपासणी केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी कासकर याला मधुमेह असल्याने शुगर तपासणीचा सल्ला दिला. अवघ्या 20 मिनिटात कासकरचे उपचार उरकण्यात आले.

त्यानंतर कासकरचा ताबा घेतलेल्या पोलिसांनी त्याची व्हीआयपी बडदास्त ठेवत त्याला बिर्याणीची मेजवानी खाऊ घातली होती.

इतकेच नव्हे तर कासकर याला फोनवरून बोलण्याची देखील मुभा देण्यात आली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पाचही पोलिसांच्या निलंबनाचे आदेश देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button