ठाणे : सौंदर्यप्रसाधने चोरणारे दोघे अटकेत | पुढारी

ठाणे : सौंदर्यप्रसाधने चोरणारे दोघे अटकेत

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडीतील गोदामांमधून 86 लाख 73 हजार 736 रुपयांची सौंदर्य प्रसाधने चोरणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.

रितेश विलास शिंदे, वैभव संजय म्हस्के रोजन शेख,समीर फारूक सय्यद हे कर्मचारी सौंदर्य प्रसाधन सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि रिपॅकिंगसाठी दिवे-अंजूर येथील बी-7,लाइट स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या इंडियन लॉजिस्टिक कॉर्पोरेशन वेअरहाऊस कॉम्प्लेक्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. मात्र कामादरम्यान चौघांनी संगनमत करून कंपनीविरुद्ध कट रचून साखर कॉस्मेटिक्स ब्रँडचा एकूण 86 लाख 73 हजार 736 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी कंपनीचे संचालक तेजस चंद्रकांत लटके यांनी नारपोली पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी वैभव म्हस्के आणि समीर सय्यद या दोघांना अटक केली आहे.

त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींनी आरोपी गुन्हे केले आहेत का? याचा तपास नारपोली पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे विजय मोरे करीत आहेत.

Back to top button