डोंबिवली : गुटख्याची रसद कल्याणच्या पोलिसांनी तोडली; कंटेनरसह 25 लाखांचा गुटखा केला जप्त | पुढारी

डोंबिवली : गुटख्याची रसद कल्याणच्या पोलिसांनी तोडली; कंटेनरसह 25 लाखांचा गुटखा केला जप्त

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणच्या पोलिसांनी कर्नाटक-कल्याण गुटख्याची रसद कारवाई करून तोडली. कल्याण पश्चिमेकडील गंधारी पुलाजवळ रविवारी पहाटे तीन वाजता खडकपाडा पोलीस आणि कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने
एका कंटेनरमधून प्रतिबंधित असलेला फोर के स्टार नावाचा गुटका जप्त केला. या गुटक्याची बाजारातील किंमत 25 लाख रुपये आहे. 20 लाख रुपये किंमतीचा कंटनेर आणि गुटका मिळून एकूण 45 लाखांचा ऐवज पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिसांनी सांगितले, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या विशेष तपास पथकातील संजय पाटील, ऋषिकेश भालेराव यांना रविवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान खासगी गुप्तहेराकडून माहिती मिळाली की, पडघा बापगाव मार्गे एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला फोर के स्टार गुटका घाऊक पध्दतीने विक्रीसाठी वाहून नेला जात आहे. त्यांनी उपायुक्त गुंजाळ यांना ही माहिती दिली. उपायुक्तांनी खडकापाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना आदेशीत करुन गांधारी पुलाजवळ भंडारी चौकात तो कंटेनर अडविण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली.

गांधारी पुलाजवळ वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आंधळे, के. सी. दाभाडे, हवा. संजय पाटील, ऋषीकेश भालेराव, पी. के. देवरे, सी. एस. थोरात यांनी सापळा लावला. 15 मिनिटांत पडघा दिशेकडून एक कंटेनर भरधाव वेगाने कल्याणमधील गंधारे पुलाजवळ आला. पोलिसांनी या संशयित कंटेनर चालकाला थांबविण्याचा इशारा करताच तो पुढे जाऊन थांबला.

पोलिसांनी कंटेनर थांबविल्याचे कळताच कंटेनरमधील रजनीकांत गायकवाड हा कंटेनरमधून उडी मारुन काळोखाचा फायदा घेत पळून गेला. पोलिसांनी कंटेनरची पाठीमागील बाजू उघडताच सुरुवातीला पोलिसांनी लाकडी भुशाची पोती आढळली. त्यानंतर पांढर्‍या रंगाची सुंगधित गुटका असलेली पोती दडवून ठेवण्यात आली होती. तंबाखुजन्य गुटका त्यात होता. या प्रकरणात उल्हासनगरमधील तीन जणांचा समावेश आहे.

आरोपींचे नावे-

मशाक मेहबुबसाब इनामदार (35, देवण तैगनौर, ता शहाबाद, जि. गुलबर्गा), लव शामसुंदर सहाणी (27, रा. सेक्शन 25, उल्हासनगर चार), प्रेमानंद दिनेश कोठारे (28, रा. सध्दार्थ कॉलनी, कैलासनगर, स्मशानभूमी बाजुला, उल्हासनगर 5) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रजनीकांत मोहन गायकवाड (28, वीर तानाजी नगर, उल्हासनगर 5) असे फरार आरोपीचे नाव आहे. हवालदार नवनाथ रामचंद्र डोंगरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button