डोंबिवली : क्राईम ब्रँचच्या जाळ्यात अडकला सराईत चोर; 2.15 लाखांच्या दुचाक्या हस्तगत

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच क्राईम ब्रँच्या कल्याण युनिटने एका चोरट्याचा माग काढून त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्याकडून महागड्या दुचाक्या हस्तगत करण्यात केल्या आहेत.
काशिम युनूस अली (22) असे या बदमाश्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील रविदासनगर भदोही जिल्ह्यातल्या कुलमंपुर-ग्यानपुर गावचा मूळचा रहिवासी आहे. सद्या कोणताही कामधंदा करत नसलेला हा बदमाश कल्याण-शिळ मार्गावरील प्रीमिअर कॉलनी फिरस्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
हा बदमाश मानपाडा-शिळ मार्गावर प्रीमिअर कॉलनी समोर येणार असल्याची खबर पोशि गुरुनाथ जरग यांना मिळाली होती. त्यानुसार क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे सिनियर इन्स्पेक्टर किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोहन
कळमकर, पोशि गुरुनाथ जरग यांच्यासह पथकाने सापळा लावून या बदमाश्याला चतुर्भुज केले. सखोल तपास केला असता काशिम अली याने चार-पाच महिन्यांपूर्वी त्याचा साथीदार अंकित कुमार शर्मा (रा. उत्तर प्रदेश) याच्या मदतीने कल्याणच्या एका मटण शॉपमध्ये काम करत असताना नंदिवलीतून आर 15 व मुंबईतील धारावी भागातून शाईन अशा दोन
दुचाक्यांच्या चोर्या केली होत्या.
या दोन्ही दुचाक्यांच्या प्लेटवर खोटे नंबर टाकून चालवत असल्याचीही माहिती त्याने दिली. क्राईम ब्रँचने त्याच्याकडून दोन दुचाक्या आणी मोबाईल फोन असा मिळून 2 लाख 15 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याला अधिक चौकशीकरिता कोळसेवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.