डोंबिवली : बनावट सोने देऊन पैसे उकळणारा गजाआड | पुढारी

डोंबिवली : बनावट सोने देऊन पैसे उकळणारा गजाआड

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आजारी पत्नीच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून हातावर बनावट सोने टेकवून डोंबिवलीकराला लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या एका बदमाशाला डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. त्याचा कालिया नामक साथीदार अद्याप हाती लागला नसून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत. भिमा सोळंकी असे अटक करण्यात आलेल्या बदमाश्याचे नाव असून त्याचा साथीदार राजू उर्फ कालीया सोळंकी हा पसार झाला आहे.

या दुकलिने अशा पद्धतीने अनेक जणांची फसवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास चक्रारांना वेग दिला आहे. पोलिस आपल्या मार्गावर असल्याची माहिती मिळताच भीमा हा वारंवार सिम कार्ड बदलत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. डोंबिवली पूर्व आजदे गावात राहणार्‍या गृहस्थाला भीमा व त्याचा साथीदार कालिया उर्फ राजू याने पत्नी आजारी असून पैश्यांची गरज असल्याची विनवणी केली. शेतात मला सोन्याचे क्वाईन सापडले आहेत, ते तुम्हाला देतो मला पैसे द्या, अशी विनवणी करत आमिष दाखवून बनावट सोने तक्रारदाराला दिले व त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळून ही दुकली पसार झाली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने रामनगर पोलिस ठाण्यात तशी फिर्याद केली. पोलिसांनी फरार भामट्यांचा शोध सुरू केला. याच दरम्यान भीमा सोळंकी याला कुणकुण लागल्याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधील तब्बल 25 सिमकार्ड बदलले. मात्र भीमा हा विठ्ठलवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी विठ्ठलवाडीमध्ये सापळा लावून भीमाच्या मुसक्या आवळल्या.त्याचा साथीदार कालिया हा पसार झाला असून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत.

Back to top button