धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका : शरद गोरे | पुढारी

धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका : शरद गोरे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका आहे, धर्माच्या नावावर अधर्म जोर धरत आहे, त्यामुळे सामाजिक दुफळी निर्माण होऊन माणसं एकमेकांपासून दुरावून विषमतेची दरी वाढत आहे, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले. डोंबिवली येथे दुसऱ्या पी.सावळाराम साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस असला पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे वैश्विक तत्वज्ञानच जगाला पुन्हा समता व शांतता देऊ शकेल. साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतीतून एकसंध समाजासाठी लिखाण करणे आवश्यक आहे, तरच साहित्याला दुर्दैवाने विचारशुन्यतेचे लागलेले ग्रहण दूर होईल. व विश्वशांती पुन्हा नव्याने उदयास येईल, असा आशावाद गोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य मुंबई प्रदेशने या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाध्यक्ष राजश्री बोहरा, स्वागताध्यक्ष अनिता गुजर, नगरसेवक बाबाजी पाटील, ज्येष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे, फुलचंद नागटिळक, अविनाश ठाकूर, नवनाथ ठाकूर, मुग्धा कुंटे, राधिका बापट, डॉ. मीना बद्रापुरकर आदीजण उपस्थित होते.

एक दिवसीय या साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथपूजनाने झाली. काही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, राज्यातील ८८ साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात सहभाग नोंदवला. तर मोठया संख्येने रसिकांनी संमेलनास हजेरी लावली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button