ठाणे; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांना समर्थन करण्यासाठी ठाण्यात एकीकडे शक्तिप्रदर्शन होत आहेत. अशातच दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी पदवी दिली आहे. बाहुबलीच्या स्वरुपात त्यांचे मोठे बॅनर देखील ठाण्यात उभारले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिंदे यांचे बाहुबली स्वरूपात उभारण्यात आलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
एकनाथ शिंदे यांना ठाणे महापालिकेतील 67 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. मंगळवारीच शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका आणि शक्तीस्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये शिवसेना महिला आघाडी देखील आघाडीवर होत्या. त्याच्या दुसऱ्या दिवशीच आता शिवसेनेच्या दक्षिण विभागाने थेट बाहुबलीच्या प्रतिमेत एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उभारली असून हे बॅनरच आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच लावण्यात आला आहे. यासंदर्भात अद्याप दक्षिण भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही स्वरुपाची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दक्षिण भारतीयांचा देखील पाठिंबा यानिमित्ताने जाहीर कारण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे .
हेही वाचा