

पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी वाणगाव नाका येथे प्रथमोत्सव को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीत उभारण्यात आलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन शनिवारी (दि.६) रात्री ते रविवारी (दि.७) सकाळी साडेसातच्या दरम्यान गॅस कटरच्या साह्याने तोडल्याची माहिती मिळाली असून त्यामध्ये असलेले 21 लाख 47 हजार 600 रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी ही रक्कम लुटून पोबारा केला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चिंचणी वाणगाव नाका येथील प्रथमोत्सव को-ऑ.हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन उभारण्यात आले आहे. शनिवार रात्री 6 ते रविवारी 7 जुलै सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरानी एटीएम मशीनमध्ये असलेल्या, सीसीटीव्ही कॅमेर्यावर काळा स्प्रे मारून आणि अलार्म सिस्टीम (गजर व्यवस्था) कापून टाकली तसेच मोठ्या गॅसकटरच्या साह्याने एटीएम मशीन कापून त्यातील 21 लाख 47 हजार 600 रुपये घेऊन पोबारा केला.
ही माहिती समजताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्यांनी वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि वाणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गुन्हेगाराचा कसून शोध घेत आहेत.