Tanjore Marathi Literary Conference 2026: दक्षिण भारतात पहिले मराठी साहित्य संमेलन; स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

Tanjore Marathi Literary Conference 2026: दक्षिण भारतात मराठी भाषा-संस्कृतीला नवी उभारी; प्रा. लक्ष्मणराव ढोबळे स्वागताध्यक्ष, महाराष्ट्र-तामिळनाडू सांस्कृतिक नात्याला मिळणार बळ
Tanjore Marathi Literary Conference
Tanjore Marathi Literary ConferencePudhari
Published on
Updated on

Tanjore Marathi Literary Conference 2026: मराठी भाषा, साहित्य आणि इतिहासाला दक्षिण भारतात नवी उभारी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे येत्या 23 सप्टेंबर 2026 रोजी ‘सरफोजीराजे भोसले द्वितीय’ मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तंजावरचे महान शासक आणि मराठी संस्कृतीचे जतन करणारे राजे सरफोजी द्वितीय यांच्या जयंतीनिमित्त हे संमेलन होणार असून, महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली तंजावर येथे झालेल्या बैठकीत या संमेलनाच्या आयोजनावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला तंजावर संस्थानचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले, तंजावर संस्थानचे युवराज आणि साहित्य परिषदेचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे भोसले, तसेच लक्ष्मण हेंमाडे, किशोर टिळेकर, अजय साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन

संयोजकांच्या माहितीनुसार, दक्षिण भारतात आयोजित होणारे हे पहिले मराठी साहित्य संमेलन ठरणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देशभरातील साहित्यिक, संशोधक, इतिहास अभ्यासक आणि मराठीप्रेमी या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राजे सरफोजी द्वितीय यांच्या कार्याला अभिवादन

तंजावरच्या भोसले घराण्यातील राजे सरफोजी द्वितीय हे केवळ कुशल प्रशासक नव्हते, तर ते बहुभाषिक विद्वान, साहित्यप्रेमी, संशोधक आणि कलासंरक्षक म्हणूनही ओळखले जातात. मराठी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू यांसह इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन, ग्रीक, डच आणि डॅनिश अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

त्यांनी जगभरातून हजारो दुर्मिळ हस्तलिखिते आणि ग्रंथांचे जतन केले. तंजावरमधील सरस्वती महाल ग्रंथालय समृद्ध करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. साहित्य, वैद्यक, विज्ञान, नाटक, संगीत आणि इतिहास या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून अनेक ग्रंथांची निर्मिती केली.

शिक्षण, आरोग्य आणि कलेच्या विकासासाठी योगदान

राजे सरफोजी द्वितीय यांनी शिक्षणाचा प्रसार, संशोधन, आरोग्यसेवा आणि कलाविकासासाठीही मोलाचे योगदान दिले. त्यांनी तंजावरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या, दक्षिण भारतात मोडी आणि देवनागरी लिपीतील छापखान्यांना चालना दिली, तसेच 'धन्वंतरी महाल'च्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाला प्रोत्साहन दिले. भरतनाट्यमसह संगीत आणि नाट्यकलेच्या संवर्धनातही त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

मराठी संस्कृतीच्या जतनाचा ऐतिहासिक उपक्रम

या संमेलनाबाबत बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे म्हणाले की, "तंजावर ही दक्षिण भारतातील मराठी संस्कृतीची महत्त्वाची भूमी आहे. राजे सरफोजी द्वितीय यांचे साहित्य, ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीसाठीचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीदिनी तंजावरमध्ये मराठी साहित्य संमेलन होणे हा मराठी भाषेसाठी अभिमानाचा क्षण आहे."

त्यांनी पुढे सांगितले की, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली होणारे हे संमेलन मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक ठरेल. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news