पारंपरिकतेला छेद देत विधवांना सुवासिनीचा मान

पारंपरिकतेला छेद देत विधवांना सुवासिनीचा मान
पारंपरिकतेला छेद देत विधवांना सुवासिनीचा मान

सांगोला : पुढारी वृतसेवा : रूढी परंपरेला छेद देत, सुवासिनी आणि विधवा असा भेदभाव न करता, विधवा महिलांना सुवासिनीचा मान देण्याचा परिवर्तनवादी आणि कौतुकास्पद निर्णय लोटेवाडी गावातील ग्रामपंचायतीने घेतला. त्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून लोटेवाडी गावातील रामचंद्र सरगर यांनी पुढाकार घेत वटसावित्री पौर्णिमा सणाचे औचित्य साधून चिंचणी मायाक्कादेवी च्या सुवासिनी कार्यक्रमासाठी विधवा महिलांना देखील हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रत केले. आणि या कार्यक्रमासाठी गावातील अनेक महिलांनी उपस्थिती लावत हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

विधवा महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बर्‍याचदा विचित्र असतोच; पण स्त्रिया बर्‍याचदा विचारांची गुंतागुंत करून स्वत:वर बंधने घालून घेतात. विधवा महिलांना आनंदाने जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्‍न स्वत:लाच विचारत वैधव्य कुणालाच स्वत:हून नको असतं. ते पदरी पडतं आपली इच्छा नसताना. मग आयुष्य थांबतं का? तर नाही. मग इच्छा मारून का जगायचं? कारण प्रत्येक स्त्रीचा मानाने आणि आनंदाने जगणे हा हक्क आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून पुरातन काळातील चालीरीती बाजूला सारत लोटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच विजयकुमार खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेमधील ठरावामध्ये सुवासिनी आणि विधवा असा भेदभाव न करता, एक नवीन दृष्टिकोन समोर ठेवून सर्वांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली.

यासह समाजातील पतीच्या निधना व अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळावर कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलांना विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी न करणे याला विरोध करीत कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे महिलांचा अधिकारावर गदा आली नाही पाहिजे.

यासाठी विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याबाबत गाव स्तरावर जनजागृती व समाज प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला. 31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या ठरावानुसार गावातील रामचंद्र सरगर सर यांनी दि. 14 जून 2022 रोजी मायाक्का देवीच्या सुवासणी व दुधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ज्या विधवा व दुसरे लग्न केलेल्या महिलांना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सवासणी म्हणून मान दिला जात नाही. त्या महिलांना मान -सन्मान देण्यासाठी निमंत्रण दिले. आणि या कार्यक्रमासाठी लोटेवाडी गावातील सर्वच महिलांनी हजेरी लावली होती. असे रामचंद्र सरगर यांनी सांगितले.

विधवा या प्रथेला मोडीत काढायचे, असे ठरवले आहे. याकरिता ग्रामपंचायत मध्ये ठरावही घेण्यात आला आहे. याला प्रतिसाद देत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम साजरा करून ग्रामपंचायतीच्या आव्हानाला गावातील रामचंद्र सरगर यांनी भरभरून प्रतिसाद देत, एक आदर्श घालून दिला आहे. गावचा सरपंच म्हणून अभिमान आहे.
– विजयकुमार खांडेकर सरपंच

सुवासिनी आणि विधवा यामधील दरी दूर करण्यासाठी सर्वप्रथम महिलांनी महिलांचा सन्मान करणे गरजेचे आहे. याची सुरुवात लोटेवाडी आणि घेरडी ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे. यामध्ये लोटेवाडी गावात विधवा आणि सुवासिनी महिलांचा सन्मान झाला. ही बाब कौतुकास्पद आहे. याचे आम्ही स्वागत करतो. याची दखल तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने घ्यावी.
– राणी माने मा. नगराध्यक्षा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news