गातजागागातजागा । प्रेममागाश्रीविठ्ठला ॥

विठ्ठल
विठ्ठल

दादा महाराज सातारकर हे मागच्या शतकात होऊन गेलेले थोर वारकरी सत्पुरुष होते. विद्यमान प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा. दादा महाराज सातारकर हे मूळ सातार्‍याचे. सुरुवातीला ते सातारा येथून बोधे महाराजांच्या दिंडीमधून पंढरपूरला जात असत. पुढे त्यांनी 1915 मधे सातार्‍याहून स्वतःची दिंडी सुरू केली व पुढे 1925 मध्ये सातार्‍याहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला न्यायला सुरुवात केली. दादा महाराजांनी संतविचाराची मांडणी करताना प्रेमावर भर दिला. याला प्रेमबोध असे म्हणतात. देव प्रेमस्वरूप आहे. देवाकडे फक्त प्रेमच मागायचे. लौकिक गोष्टी मागायच्या नाहीत किंवा देवाला घाबरण्याचीही गरज नाही. देव सतत सोबत असल्यामुळे भक्ताला या संसारालासुद्धा घाबरण्याची गरज नाही. अशी ही मांडणी आहे.

1947 मध्ये दादा महाराजांचे निधन झाल्यावर त्यांचे चिरंजीव आण्णा महाराज यांनी हा पालखी सोहळा पुढे चालवला. त्यांचे दुसरे चिरंजीव आप्पा महाराज यांनी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी सुरू केली व ते आळंदीवरून जाऊ लागले. 1956 मध्ये आण्णा महाराजांचे निधन झाल्यावर सातार्‍याहून सुरू झालेला पालखी सोहळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली तेव्हा दादा महाराजांचे शिष्य गो. शं. राहिरकर यांनी हा सोहळा पुढे चालू ठेवायचे ठरवले. दादा महाराजांचे इतर शिष्य भा. पं. बहिरट, अण्णा टिळे ही मंडळी सोबत होती. दादा महाराजांच्या काळात दोनशे मंडळी या सोहळ्यात असत. राहिरकरांनी सोहळा सुरू ठेवला तेव्हा पहिल्या वर्षी फक्त 15-20 लोक होते.

गो. शं. राहिरकर हे मूळ पंढरपूरचे रहिवासी. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला होता. पुढे पंढरपूरचे भा. पं. बहिरट यांच्यामुळे ते दादा महाराजांच्या सहवासात आले व वारकरी झाले. दादा महाराजांचे शिष्य बनले. त्यांनी दादा महाराजांचे चरित्र व इतर संतांची चरित्रे लिहिली आहेत. बडवे मंडळींविरोधात झालेल्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. दादा महाराजांच्या हयातीतच त्यांनी दादा महाराजांना आपल्या घरी बोलावून त्यांची पूजा केली.

– अभय जगताप

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news