सोलापूर : अल्पभूधारक, शेतमजुरांना मिळतेय आर्थिक स्थैर्य

सोलापूर : अल्पभूधारक, शेतमजुरांना मिळतेय आर्थिक स्थैर्य
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण 262 प्रकारची कामे अनुज्ञेय आहेत. या योजनेतून अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ लागले आहे. सिंचन विहीर, शेततळे, विहीर पुनर्भरण, फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, बांधबंदिस्ती, गुरांचे गोठे, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, अझोला खड्डा, नाडेप टाके व गांडूळ खत टाके व अन्य वैयक्तिक लाभाची कामे घेऊन लाभार्थी स्वतःसाठी व स्वतःच्या कामासाठी मग्रारोहयोमध्ये काम करून स्वतःसाठी कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण करू लागले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणारा मजूर आत्मनिर्भर होत आहे. परिणामी, त्याचे जीवनमान उंचावत आहे.

भूमिहीन मजुरांसाठी शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, गुरांचा गोठा, नाडेप, गांडूळ खत टाके बांधकाम आदी कामे मजूर कुटुंबांना मिळत आहेत. किमान 100 दिवस एका कुटुंबाने काम केले तर व्यवसाय प्रशिक्षणाची संधी प्राप्त होत आहे. प्रत्येक गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या गटांना सामुदायिक शेततळे, मत्स्यपालन तळे, पाझर तलाव, गट स्तरावर अन्नधान्याचे साठवण गोदाम, बचत गटासाठी इमारत बांधकाम इतर प्रकारची कामे घेता येत असल्याने आर्थिक उत्पन्नाचा मार्ग सुकर झाला आहे. सार्वजनिक लाभाच्या योजनांमध्ये गावस्तरावर सिमेंट काँक्रीट रस्ते व नाली बांधकाम, ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी बांधकाम शाळा किंवा अंगणवाडी शौचालय बांधकाम,

तलाव बॉडी नाला खोलीकरण, बंधारा बांधकाम व दुरुस्ती, वृक्ष लागवड आदी कामे गावांतर्गत व शिवारात घेता येतात.
एखादा लाभार्थी व त्याची पत्नी स्वत:च्या घरी गुरांचा गोठा या कामावर काम करीत असल्यास त्याला फक्त 256 रुपये मजुरी मिळत नसून त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये प्रतिदिवस मिळत असते, ते कसे ते समजून घेऊ. गुरांच्या गोठ्याची किंमत एकूण किंमत – 77400 रुपये, अकुशल – 6400रुपये, कुशल-71000 रुपये, एकूण मनुष्य दिवस-25, पती – पत्नी मिळून काम केल्यास 12 मनुष्य दिवस प्रत्येकास मिळतील. त्यानुसार दोन आठवड्यांत काम पूर्ण होईल. 12 दिवसांत काम पूर्ण झाल्यास त्या कुटुंबासाठी अकुशल व कुशल प्रतिदिवस 6450 रुपये प्रतिदिवस शासन खर्च करेल. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला 6431 रुपये यानुसार प्रति दिवस मजुरी मिळेल व त्या मजुराला 3225 रुपये रोज मिळू शकणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले.

जुनी रोहयो अन् मग्रारोहयोमधील फरक

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांना लखपती करण्यासाठी योजना नव्या पध्दतीने राबविली जात आहे. यामध्ये वैयक्तिक कामांवरील लाभार्थी यांना मजुरी देणे, मजुरीतून मालमत्ता निर्माण करणे, मालमत्तेतून शेतकरी, शेतमजूर यांचे जीवनमान उंचावणे यासाठी मनरेगा काम करत आहे. मजुरांना 15 दिवसांऐवजी आठ दिवसांत मजुरी अदा केली जात आहे. मजुरी अदा करताना थेट मजुरांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे मजुरी अदा केली जात आहे. त्यामुळे बनावट खाती अथवा व्यक्तींच्या नावावर रक्कम हस्तांतरण करुन भ्रष्टाचार करणार्‍यांवर चाप बसला असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. देशमुख-मोहिते यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news