

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद सोलापूर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, या करारामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना एक कोटीचे विमा कवच मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या पुढाकारातून हा करार साकार झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी कराराची पार्श्वभूमी, कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ आणि योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. राज्य शासन वेतन पॅकेज खात्यांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा अभ्यास करून कर्मचाऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लेखाधिकारी हरीश म्हेत्रस, अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, एस. पी. माने, दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, रणजीत घोडके, प्रकाश शेंडगे उपस्थित होते. सूत्रसंचालन लेखाधिकारी उमाकांत राजगुरू यांनी केले.