

सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून, त्यासाठी आज शुक्रवारी दि. 6 फेबु्रवारी आणि शनिवारी दि. 7 फेबु्रवारी रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदान कर्तव्याकरिता अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तालुकास्तरावरून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पथक सकाळी 11.30 वाजता नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यास सुरुवात करणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडणाऱ्या शाळांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उद्योग उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या परिपत्रकानुसार शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ज्या शाळांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची निवडणुकीच्या कामाकरिता नियुक्ती केलेली नाही, त्या शाळांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत शाळा भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे तात्काळ पालन करण्यात यावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी संबंधितांना दिल्या आहेत. मतदाना दिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.