

मोहोळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्याने जिल्हांतर्गत बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालामुळे बदली इच्छुक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. मे महिन्याची 10 तारीख उलटली आहे. ही ऑनलाईन बदली प्रक्रिया केव्हा सुरु होते ? आणि या बदल्या कधी होणार? याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियादेखील ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. जे शिक्षक आंतरजिल्हा बदली आपसी बदलीद्वारे आले होते त्यापैकी कनिष्ठ शिक्षकांची सेवा ही बदलीसाठी ग्राह्य धरावी याकरिता शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या अनुषंगाने आपसी जिल्हा सेवाज्येष्ठते संदर्भात निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला 5 मे पर्यंत स्थगित दिली होती.
5 मे रोजी न्यायालयात यावर सुनावणी होऊन 9 मे रोजी न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीमधील आपसी बदलीद्वारे बदली झालेल्या शिक्षकांपैकी सेवा कनिष्ठ शिक्षकांची सेवा दोन्ही शिक्षकांना बदलीसाठी ग्राहा धरावी, असा निकाल दिला आहे.