

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण जाहीर झाले आहे. ओबीसी प्रवर्गातील पुरुष किंवा महिलेसाठी अध्यक्षपद राखीव असणार?आहे. तसे पत्र राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. दरम्यान, हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक राजकारणात इच्छुक उमेदवारांच्या आणि पक्षांतर्गत घडामोडींना वेग येणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर केले. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवले आहे. त्यामुळे या पदावर ओबीसी महिला किंवा पुरुष उमेदवाराची निवड होणार आहे. जिल्ह्यातील अनेक ओबीसी नेत्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
दरम्यान, गतवेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी होते. त्यावेळी अनिरुद्ध कांबळे यांना अध्यक्ष म्हणून संधी मिळाली होती. आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने ओबीसींमधील अनेक नेत्यांना आताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यासारखे वाटत आहे.
कोणत्या तालुक्यात कोणते आरक्षण येणार?
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापतींसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात कोणते आरक्षण राहणार याची माहिती शासनाने दिली नाही. परंतु ते आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात येण्याची शक्यता आहे.