

बार्शी : तालुक्यातील वैराग येथे जुन्या वादातून एका 29 वर्षीय तरुणाचे अपहरण करून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे वैरागसह बार्शी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैराग भागातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे चिंताजनक चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.
सागर शिवाजी गरड (रा. दत्तनगर, वैराग) हे सकाळी घरी असताना विक्रम सावंत व ओम चिकणे यांनी कामाचे आमिष दाखवून त्यांना दुचाकीवरून लाडोळे रोडवरील निर्जन खाणीजवळ नेले. तेथे पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून सोनू जंगले व प्रतिक पिचके यांनाही बोलावण्यात आले. यानंतर चौघांनी मिळून सागर यांना बेदम मारहाण केली. विक्रम सावंत याने कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले.
जखमी सागर यांच्यावर सध्या बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वैराग पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. वैराग पोलिस तपास करत आहेत.