

सोलापूर : अलीकडे तरूणाईची जीवनशैली बदलली असून त्यांची धावपळ वाढली आहे. याचा फटका त्यांच्या आरोग्यावर होत आहे. तरुणाई घरगुती जेवणाऐवजी हॉटेलमधील चमचमीत पदार्थांच्या जेवणावर व चायनीजवर ताव मारते. अशा पद्धतीच्या जीवनशैलीने पावणेतीन लाखाहून अधिक तरुणांना उच्च रक्तदाब व शुगरने बाधित व्हावे लागले आहे. ही वाढती संख्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे.
तरुणाई उच्चशिक्षण घेऊन गतीने धावत आहे. नोकरी व व्यवसायानिमित्तही व्यस्त असल्याने त्यांना वेळेवर घरचे जेवण मिळत नाही. मिळालेले जेवण प्रमाणापेक्षा जास्त मसालेदार असते. मसालेदार जेवण व चायनीज खाण्याचा परिणाम तरुणाईच्या आरोग्यावर होत आहे. दीड लाखाहून अधिक तरुण उच्च रक्तदाब तर सव्वा लाख जण शुगरने बाधित झाले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व्हेक्षण केले आहे. कर्करोग, स्ट्रोक, मधुमेह, दीर्घकालीन श्वसनाचे आजार व हृदयविकाराचे वाढते प्रमाण कमी करण्याचा याचा मुख्य उद्देश आहे.
तीस वर्षांहून अधिक वयाच्या 14 लाख 22 हजार तरुणांपैकी 8 लाख 84 हजार तरुणांच्या केलेल्या तपासणीत 1 लाख 62 हजार 522 तरुण उच्च रक्तदाब व 8 लाख 13 हजार 504 जणांच्या तपासणीत 1 लाख 2 हजार 55 तरुण शुगरने बाधित असल्याचे आढळून आले. शिवाय, असंसर्गजन्य आजारांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. 60 ते 65 टक्के मृत्यू हे या आजाराने होतात.
आजाराचे धोके
जादा फास्टफूडचे सेवन, असंतुलित आहार, व्यायाम, जंकफूड, जादा मीठाचे आहार, साखर, तेलयुक्त आहार, जेवणात भाज्यांच्या कमी वापरासह आरोग्याकडे दुर्लक्ष, अनुवंशिकता, झोपेचा अभाव यामुळे आजाराचे धोके वाढतात.