

सोलापूर : नागपंचमीच्या दुसर्या दिवशी गौराईचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहरीत पडून मृत्यू झाला. परंतु हा नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाइकांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. आकाश काशिनाथ केंगार (वय 24, रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
सोलापूर -अक्कलकोट रोडवर कुंभारी गावच्या हद्दीत मौला साहेबलाल शेख यांच्या शेतातील विहरीत बुधवारी (दि.30) मध्यरात्री काही लोक गौराईचे विसर्जन करण्यासाठी वाजंत्रीसह आले होते. गौराईचे विसर्जन करताना आकाश केंगार हा विहरीत पडला.
आकाशच्या या मृत्यूनंतर नातेवाइकांनी हा नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप केला. गौराईचे विसर्जन करताना आकाशला मारण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. दरम्यान याबाबत बोलताना वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी प्राथमिक तपासात हा नरबळीचा प्रकार नसल्याचे सांगत तपासाअंती सर्व स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मध्यरात्रीची वेळ त्यात विहिरीतील पाणीही जास्त. त्यामुळे इतर लोकांनी आरडाओरड सुरू केली. बाजूच्या वस्तीवर जाऊन गावकर्यांना बोलावले. परंतु रात्र असल्याने कुणीच त्याला वाचविण्यासाठी गेले नाही. दरम्यान, ही घटना आकाशच्या घरच्यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि वळसंग पोलीस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्र असल्याने मदतकार्य करता येत नव्हते. सकाळ पासून आकाशला शोध सुरू झाला. सोलापूर महापालिकेचे अग्निशमन पथकही कामाला लागले. दुसरीकडे आकाशच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश सुरू केला. दुपारच्या सुमारास आकाशचे प्रेत सापडले. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.