

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अश्लील कृत्य करणार्या व्यक्तीस जमावाने मारहाण केली; परंतु चबुतर्यावरून उतरताना तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली.
बुधवारी (दि. 3) सकाळी सहाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन अश्लील कृत्य करीत होता. ही घटना पाहताच त्याला रोखण्यासाठी अनेकजण धावले. त्यातील काही जणांनी त्याला मारहाणही केली. दरम्यान, या सगळ्या गोंधळात चबुतर्यावरून उतरताना त्या व्यक्तीचा तोल गेल्याने तो खाली पडला. ही घटना समजताच फौजदार चावडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस हेड कॉन्स्टेबल खाटमोडे यांनी त्यास जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचारापूर्वी तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर फौजदार चावडी पोलिसांनी दोन वेगळे गुन्हे दाखल केले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मृत अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला तर त्या इसमाच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सूरज सुरेश सुरवसे (रा. भवानी पेठ, सोलापूर) आणि प्रसाद ऊर्फ प्रशांत दत्तात्रय मरगणे (रा. अवंतीनगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या नागरिकांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.