

सोलापूर : दिव्यांग भावाची चेष्टा करताना मध्ये पडलेल्या 18 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. पुढे उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर लमाण तांडा येथे सोमवारी (दि. 20) ही घटना घडली होती. सुजित सुभाष राठोड (वय 18, रा. मरवडे लमाण तांडा, बालाजी नगर, ता. मंगळवेढा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
सुभाष राठोड यांच्या फिर्यादीवरून शशिकांत पवार, आशिष पवार, सागर राठोड यांच्यावर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सागर राठोडला अटक केली असून इतर दोघे फरार आहेत. सुजित राठोडचा भाऊ रणजित हा दिव्यांग आहे. संशयित आरोपी शशिकांत याने रणजित याला मारहाण केली.
यावेळी सुजित तेथे आला. जाब विचारत असताना आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. सुजितच्या डोक्यात जोराचा मार बसल्याने तो जागीच बेशुद्ध झाला होता.