

पोखरापूर : शेताजवळ असलेल्या महावितरणच्या डीपीला आग लागल्यामुळे ती आग आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या युवकास विजेच्या ताराचा शॉक लागला. यात त्याचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. मनोज विलास डंके असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शेटफळ (ता. मोहोळ) येथे ता. 15 रोजी सकाळी 11.37 वा. दरम्यान घडली.
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील शेती गट नंबर 13 लगत असलेल्या एम.एस.ई.बी. डीपीला आग लागली असल्याने ती विझवण्यासाठी मनोज विलास डंके, आबासाहेब नामदेव खडके, नामदेव चंद्रकांत खडके, व सिद्धू खडके तेथे गेले होते. आग विझवून परत येत असताना मनोज डंके यास तुटून पडलेल्या तारेचा शॉक लागून तो खाली पडला. त्यास नामदेव खडके व अरुण भोसले यांनी पकडल्याने त्यांनाही शॉक लागून ते जखमी झाले. तिघांनाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर आबा खडके यांनी धावत जाऊन डी.पी.तील फ्युज काढले. मनोज डंके यास तात्काळ पंढरपूर येथे उपचारास दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी अरुण भोसले रा. शेटफळ याने मनोज डंके याच्या मृत्यूस मोहोळचे उपकार्यकारी अभियंता कलशेट्टी, शेटफळ कार्यालयाचे सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम ढेरे व सोलापूरचे कार्यकारी अभियंता राठोड हे जबाबदार असल्याचे नमूद करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.