

सोलापूर : शहरातील कर्णिकनगर परिसरात तरुण-तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 19) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामागचे कारण समजू शकले नाही.
रोहित भिमू ठणकेदार (वय 23, रा. शांतीनगर, मड्डी वस्ती, सोलापूर) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (वय 23, सध्या रा. मु. पो. व्हीटीसी शिरूर, ता. बागलकोट, जि. विजयपूर, कर्नाटक, कायमचा पत्ता शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
शहरातील कर्णिकनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल सोसायटीतील घर नंबर 600 बी मध्ये पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये तरुण आणि तरुणीने छताला असलेल्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी दोघेही मयत झाल्याचे जाहीर केले.
मयत रोहित ठणकेदार हा एका दुकानात गाडीवर ड्रायव्हर होता. गेल्या पंधरा दिवसांपासून तो घरी आला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणी अश्विनी केशापुरे ही कर्नाटकातील एका महाविद्यालयात डी फार्मसी करीत होती. दोन दिवसांपूर्वी ती काकांच्या घरी आली होती. बुधवारी (दि. 18) सायंकाळी ती कॉलेजला कर्नाटकात जाते म्हणून निघाली. रात्रीपासून ती कुणाचाच मोबाईल फोन उचलत नव्हती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. रोहित हा अश्विनीच्या घरी जात होता. माझा दूरचा भाऊ असल्याचे ती सांगत होती. दोघांनी आत्महत्या केलेले घर हे रोहित याच्या मालकाचे असल्याचे सांगण्यातआले.
दरम्यान, शासकीय रुग्णालयात दोघांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. अचानक झालेल्या या घटनेने घरच्यांनी हंबरडा फोडला. दरम्यान, दोघांनी आत्महत्या का केली याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीची पोलिस तपासणी करीत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.