Solapur News: नापिकीमुळे यावलीत द्राक्ष बागेवर कुऱ्हाड
बार्शी : महाराष्ट्राबरोबरच बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. सततच्या नापिकीचा परिणाम म्हणून तालुक्यातील यावली येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली असून त्याने एक एकर द्राक्ष बाग तोडण्यास सुरुवात केली आहे.
शेतकरी ईश्वर पोकळे यांनी पत्नी अनिता यांच्या नावावर असलेल्या गट नंबर 626 मधील क्षेत्रामध्ये एक एकर द्राक्ष बाग तीन वर्षांपूर्वी लावली होती. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये निसर्गाचे संतुलन बिघडल्यामुळे बार्शी बरोबरच महाराष्ट्रातील अनेक द्राक्ष बागा पूर्णतः फेल गेल्या आहेत. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.
द्राक्ष शेतीमधून अतिवृष्टी व महापुरामुळे उत्पन्नच मिळत नसल्यामुळे बाग जगवायची कशी या एका विचाराने शेतकरी हवालदिल झाले असून त्यामुळे त्यांनी जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागेवर आपल्या पाणवत्या डोळ्यांनी कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील शेतकरी नैराश्यात गेला असून त्यांच्या पुढे लाखो रुपये खर्च करून आणलेल्या बागेचे कर्ज कसे फेडायचे हा एकच प्रश्न निर्माण झाला आहे.

