

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना श्रींच्या विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये श्रींच्या तुळशीपुजेचा समावेश आहे. सदर पूजा बुकिंगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, ही पूजा देशभरातील भाविक घरबसल्या बुकिंग करून पुजेसाठी येत असतात. या भाविकांना पुजेची माहिती व्हावी व पुजेच्या अनुषंगाने सूचना देण्यासाठी प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही माहिती, सूचना देण्यात येतात.
मात्र, पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येते. यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नसल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.
तुळशी पुजेवेळी श्री संत तुकाराम भवन येथे आचमन करून संकल्प करण्यात येतो. त्यानंतर श्री गणपतीचे स्मरण, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे स्मरण व विष्णूसस्त्रनाम पठण करून पूजा करण्यात येते. यासाठी मराठी व संस्कृत भाषेचा वापर करण्यात येतो. तथापि, पूजेसंबंधी माहिती सर्व भाविकांना व्हावी या उद्देशाने प्राधान्याने मराठी व आवश्यकता भासल्यास हिंदी व इतर भाषेतून माहिती देण्यात येते.
राहुल सातपुते या भाविकाने शनिवार, दि. 9 रोजी मंदिरात हिंदी भाषेतून पूजा केल्याची तक्रार केली आहे. या केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.