

सोलापूर : कौशल्य विकास विभागाला जागतिक बँक 1200 कोटी तर केंद्र शासन 100 कोटी निधी देणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी सहा प्रकारचे न्यू एज कोर्सेस सुरू करत आहोत. यापैकी सोलापूर जिल्ह्यातील सर्व 12 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी किमान एक नवीन अभ्यासक्रम यावर्षीपासून आपल्या संस्थेत सुरू करावा. मशिनरी व अन्य बाबीसाठी प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला 1.25 कोटीचा निधी विभागामार्फत उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कौशल्य विकास विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. देवेंद्र कोठे, राजू राठी, रोहिणी तडवळकर, कौशल्य विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव, पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे, उपयुक्त अनुपमा पवार, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचीम, सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, मित्रा संस्थेचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते.
सोलापूरच्या महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनुक्रमे सोलार टेक्निशियन व इंटरनेट ऑफ थिंग्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करत असल्याबद्दल मंत्री लोढा यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक आयटीआयने किमान एक रोजगार मेळावा घ्यावा व त्यामध्ये किमान 50 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.
यावेळी जनता दरबारात आलेल्या नागरिक नागरिकांच्या तक्रारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसंबंधी असलेल्या सूचना व मागण्या या दृष्टीने लोढा यांनी निवेदने स्वीकारली. आलेल्या सूचनावर सकारात्मक निर्णय घेतले जातील असे सांगितले.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे 150 उद्योजकांशी लोढा यांनी निवेदन भवन येथील सभागृहात संवाद साधला. उद्योजक व उद्योगांच्या अडीअडचणींची माहिती घेऊन त्यावर शासन सकारात्मक दृष्टीने विचार करेल, असे त्यांनी सांगितले.