

सोलापूर : कामगारांचे शहर असलेल्या सोलापुरात बालकामगारांची संख्या ही मोठी आहे. कायद्याने बालकामगार ठेवणे गुन्हा असला, तरी घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पालकांच्या संमतीने लहान मुलांना कामावर पाठवले जाते. त्यामुळे बालकामगार ठेवल्यास केवळ कारवाई नाही, तर नागरिकांमध्ये जनजागृती आणि समुपदेशन करण्याची गरज आहे.
सोलापुरातही बालकामगारांची संख्या लक्ष वेधणारी आहे. परंतु आईबापच नाईलाजाने मुलांना कामाला पाठवीत असल्याचे चित्र आहे. महागाई, नोकर्यांचा अभाव, कमी वेतन आणि त्यातच व्यसनाधीनता यामुळे बालकामगारांचे प्रमाण गेल्या काही वर्षात तर हे प्रमाण वाढत चालल्याचे दिसते. बालकामगार ठेवणार्या आस्थापनांवर कारवाईच्या बातम्या येतात. परंतु पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बालकामगारांची संख्या कमी करायची असेल तर कारवाईबरोबरच पालकांमध्ये जनजागृती आणि समुदेशन करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात समुपदेशन करण्यावर भर दिल्यास सोलापुरातील बालमजुरीची प्रथा बंद होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रत्येक बालकामगाराला दरमहा 150 रुपये विद्यावेतन देण्यात येते. राज्य शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमाचा विशेष प्रशिक्षण केंद्रात अवलंब करण्यात येतो. शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात, बालकामगारांना त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्यातील कौशल्यास अनुरूप असे व्यवसाय पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते.