

सोलापूर : नॉर्मल डिलीव्हरी करून देतो, असे सांगून गोलचावडी येथील हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेस अॅडमीट करून घेतले. महिलेला त्रास होत असताना कोणतेही उपचार न करता रात्री महिला अत्यवस्थ झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. परंतु तेथे उपचार सुरू असताना महिला आणि बाळ दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हारूण नजीर बागवान (वय 23, रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. सुनिता देगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हारूण बागवान यांच्या पत्नी समीना बागवान (वय 19) या गर्भवती होत्या. मंगळवार बाजार येथील गोलचावडी हॉस्पिटल येथे डॉ. सुनिता देगावकर यांच्याकडे त्यांनी उपचार घेतले. नॉर्मल डिलीव्हरी करून देते म्हणून डॉ. देगावकर यांनी समीनाला 18 मे रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.
नॉर्मल डिलीव्हरीच्या नावाखाली तिच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत. पेशंट अत्यवस्थ झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यामुळे हारूण यांनी समीनाला शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारास विलंब झाल्याने समीना आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद हारूण यांनी दिली आहे. त्यानंतर डॉ. सुनिता देगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शेख करीत आहेत.