

सोलापूर : पैशाच्या जोरावर राज्यात भाजप आणि शिंदेसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्यांना फोडण्याचे राजकारण चालू आहे. फोडाफोडीचे हे राजकारण आपण हाणून पाडू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करण्यासाठी खैरे हे गुरूवारी (दि. 26) सोलापूर दौर्यावर आले होते. शहरात विविध मतदारसंघांमध्ये विभागनिहाय बैठकांचा आढावा घेऊन सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. राज्यात महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार, कोणीही सुरक्षित नाही, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महागाई गगनाला भिडली आहे. अधिकार्यांना खोके देऊन पोस्ट मिळवावी लागत आहे. ही राज्य शासनाची शोकांतिका आहे. या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या हिंदी सक्ती विरोधात सात जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला राज्यभरातून शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेवेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, राज्य संघटक उद्धव कदम, लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, महिला उपनेत्या अस्मिता गायकवाड. प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर उपस्थित होते.