

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे 102 कारभारी निश्चित झाले असून नुकत्याच पार पडलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 87 जागा जिंकत भाजपचे कमळ पुन्हा महापालिकेवर फुलले असून यंदा महापौर भाजपचाच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात महापौरपदी कोणाची वर्णी लागेल, याची निश्चिती महापौर आरक्षण जाहीर झाल्यानंतरच होईल. यामुळे सोलापूरचा 39 वा महापौर कोण, याकडे राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आतापर्यंतच्या महापालिका इतिहासाकडे पाहिले असता 1981 ते 1985 या प्रशासकीय कालावधीचा अपवाद वगळता आजवर एकूण 38 महापौर झाले आहेत. यामध्ये सात महिला महापौरांनी शहराचे नेतृत्व केले असून उर्वरित काळात पुरुष महापौरांना संधी मिळाली. विशेष म्हणजे महापौरपद खुले असतानाही महिलांना संधी देण्याची परंपरा सोलापूरने जपली आहे. मात्र यंदा खुला पुरुष आरक्षण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून तसे झाल्यास महापौरपदासाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
या शर्यतीत महापालिकेतील ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. खुला पुरुष आरक्षण जाहीर झाल्यास देवेंद्र कोठे यांचे बंधू प्रथमेश कोठे किंवा भाऊजी विनायक कोंड्याल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र चित्र इतके सोपे नाही. या प्रक्रियेत आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. पक्षांतर्गत समन्वय, अनुभव, सामाजिक, राजकीय समीकरणे आणि नेतृत्वक्षमता या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजपाचे संख्याबळ भक्कम असले तरी सोलापूरचा 39 वा महापौर कोण होणार, हा प्रश्न अद्याप खुलाच आहे. सत्ता निश्चित असली तरी आरक्षणानुसार नाव निश्चित होईपर्यंत शहरातील राजकीय तापमान मात्र वाढतच जाणार आहे.
कोठे समर्थकांना महापौरपद मिळू शकते
महापौरपदाचे दावेदार असलेले आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी शिवसेनेच्या पोतन यांचा 14 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. विक्रमी 14367 मताधिक्याने विजयी झाले आहेत; तर देवेंद्र कोठे यांचे बंधू प्रथमेश कोठे यांनी देखील स्वर्गीय महेश कोठे यांच्या निधनानंतर ती जागा अबाधित ठेवत त्या जागेवर कमळ फुलवत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. कोठे समर्थकांना महापौरपद देण्याच विचार झाल्यास या दोघांची नावे आघाडीवर असण्याची शक्यता आहे.