

मोहोळ : ‘शक्तिपीठ महामार्गाची’ खरोखर कोणाला गरज आहे, जनतेला की उद्योजकांना? हे प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. श्रीरंग लाळे यांनी या महामार्गाचा प्रारंभबिंदू असलेल्या पवनार येथे मोहोळवरून 1 हजार 100 किमीचा प्रवास करून प्रत्यक्ष भेट दिली. हा महामार्ग विदर्भातील खाण उद्योजकांना सागरी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग नेमका कसा आहे? , याची आवश्यकता तपासण्यासाठी अॅड.लाळे यांनी मोहोळ (जि. सोलापूर) ते पवनार (जि. वर्धा) असा 1 हजार 100 किलोमीटरचा प्रवास स्वखर्चाने केला आहे. या प्रस्तावित महामार्गावरील विविध गावांतील शेतकरी, उद्योजक तसेच वाहन चालकांशी त्यांनी चर्चा केली. याठिकाणी रेल्वेचे दळणवळण उत्तम असून येथून जवळच वर्धा हे ठिकाण आहे. रात्री 10.30 वाजता त्यांनी प्रवासाला सुरुवात केली व सकाळी 6.30 वाजता ते वर्धा येथे पोहचले. अवघ्या सात तासांत त्यांनी हा प्रवास पूर्ण झाला.
त्यांनी मोहोळ-सोलापूर-तुळजापूर-लातूर-नांदेड यवतमाळ-पवना असा प्रवास केला. रत्नागिरी-नागपूर या सध्याच्या मार्गावर अनेक ठिकाणी सहापदरी तर काही ठिकाणी चारपदरी रस्ता आहे. अत्यंत सुस्थितीत सिमेंटचा रस्ता असून, या मार्गावर वाहनांची वर्दळही अत्यंत कमी असून, वेगाने प्रवास करता येतो, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या या रस्त्यावरून सात तासात जर पोहचता येते तर स्वतंत्र शक्तिपीठ महामार्गाची खरोखर गरज नेमकी काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात खाण व स्टील उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. येथील नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाहतुकीसाठी सागरी मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी हा महामार्ग तयार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रादेवीपासून केवळ 71 किलोमीटर अतरांवर गोव्यात आदाणी उद्योग समूहाचे पोर्ट असून, खनिज संपत्ती सागरी मार्गाने विदेशात नेण्यासाठी हा महामार्ग होत असल्याचा आरोप अॅड. लाळे यांनी केला आहे.