

सोलापूर : मागील अनेक वर्षांपासून सोलापूरहून विमानसेवा सुरू झालेली नाही. येथील विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात उड्डाणसेवा सुरू न झाल्याने येथील अर्थव्यवस्था आणि पर्यटनावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे सोलापूर विमानतळावरून विमानाचे टेक ऑफ कधी होणार, अशी विचारणा सोलापूरकरांनी डीजीसीएकडे केली आहे.
सोलापूर विमानतळासाठी फ्लाय-91 एअरलाइन्सकडून मुंबई आणि गोवा येथे 23 डिसेंबर 2024 पासून उड्डाणे सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानेही सोलापूर-मुंबई आणि मुंबई-सोलापूर विमानसेवांसाठी वेळेचे स्लॉट राखीव ठेवले आहेत. प्रत्यक्षात या सेवेला अद्याप सुरुवात झालेली नाही. यामुळे सोलापूरच्या विकासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नांमुळे सोलापूरकरांचे नागरी विमानसेवा सेवेचे स्वप्न प्रत्यक्षात दिसताना प्रशासनाच्यावतीने रोज नवनवीन कारणे पुढे करुन विमानसेवा पुढे ढकलण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. डीजीसीएकडून लवकरात लवकर ठोस निर्णय होऊन सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी मागणी सोलापूरकर अन् सोलापूर विकास मंचची आहे.