

भीमानगर : उजनी धरणात मोठ्या प्रमाणात येणारा विसर्ग पाहता धरणातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता 1600 क्युसेक्स वीजनिर्मितीसाठी सोडण्यात आला असून त्यात वाढ करून सायंकाळी 7 वाजता भीमानदीत 10 हजार क्युसेक्स चा विसर्ग सोडला आहे. असा एकूण 11600 क्युसेक्स विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उजनी धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाचा जोर वाढल्याने उजनी धरणात शुक्रवार दि.20 जून दुपारी तीन वाजता दौंड वरून 72502 क्युसेक्स विसर्ग येत असून शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता अधिक 68.28 टक्के उजनी धरण भरले आहे. मागील शुक्रवारी ही पातळी 38 टक्के होती, तर सध्याची पातळी 68.28 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच 8 दिवसांत सुमारे 30 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मुख्यत पुणे जिल्ह्यात, विशेषतः भीमा नदीच्या वरच्या भागांमध्ये झालेल्या पावसामुळे झाली आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
उजनी धरणातील एकूण साठा सध्या 100.24 टीएमसी इतका आहे, त्यापैकी 36.58 टीएमसी हा उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासात पाणी साठ्यात 3 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरण भरून येण्याचा वेग मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.
भीमा खोर्यातील इतर धरणांची स्थितीही सकारात्मक आहे. उदाहरणार्थ, घोड आणि विसापूर ही दोन्ही धरणे 80 टक्क्यांहून अधिक भरली आहेत, तर खडकवासला धरणातही 60 टक्क्यांपर्यंत पाणी साठले आहे. हे सर्व मिळून उजनीला विसर्ग वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. धरण लवकर भरत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
दि.20 सायंकाळी. 6 वाजता
एकूण पाणी पातळी- 495.300 मी
एकूण पाणीसाठा- 100.24 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा- 36.58 टीएमसी
टक्केवारी :- + 68.28 टक्के