

पंढरपूर : एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे शेती पिकांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. असे असताना दुष्काळी भागातून वाहत येणारी माण नदी ऐन उन्हाळ्यात पंढरपूर तालुक्यात वाहत आहे. महमदाबाद शेटफळ येथून उजनी कालव्याचे पाणी माण नदीपात्रात सोडून सरकोलीपर्यंतचे बंधारे भरुन घेण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले आहे. या भागात ऊस, फळबागा, चारा पिके जोमाने डोलू लागली आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या सीमावर्ती भागातून माण नदी वाहते. मात्र, पावसाळा सोडला तर ही नदी कोरडीच असते. त्यामुळे या भागातील शेतकरी चारा पिके जास्त प्रमाणात घेतात. परंतु, ऐन उन्हाळ्यात महमदाबाद शेटफळ, तावशी-मारापूर, सिध्देवाडी, ओझेवाडी, सरकोली येथील माण नदीवरील बंधारे उजनी कालव्याच्या पाण्याने भरुन घेण्यात येतात. या उन्हाळी हंगामातही माण नदीवरील पंढरपूर भागातील बंधारे भरुन घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ऊस शेती फुलत आहे. तर द्राक्षे, डाळींब, बोर या फळबागांचा हंगामही जोमात सुरू आहे. बंधारे भरुन घेण्यात आले असल्याने जूनपर्यंत पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. विद्यमान आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माण नदीतील बंधारे भरुन घेण्यासाठी उजनी कालवा विभागाकडे पाठपुरावा केला होता. तर या अगोदर पुणे येथील सिंचन बैठकीतही मागणी केली होती. याचा विचार करुन माण नदीतील बंधारे उजनीच्या पाण्याने भरुन घेण्यात आले आहेत. या पाण्यामुळे शेतीच्या पाण्यासह जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.