Eknath Shinde : वारकरी हाच खरा व्हीआयपी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी
Eknath Shinde : वारकरी हाच खरा व्हीआयपी
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : कार्तिकी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. वारकरी हाच खरा व्हीआयपी आहे. त्यांना विठ्ठलाचे दर्शन वेळेत मिळाले पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहात कार्तिकी वारीची आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, वारी ही निर्मल व स्वच्छ असली पाहिजे. वारकरी हाच व्हीआयपी असल्याने आपण व्हीआयपी दर्शन बंद केलेले आहे. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये. पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. प्रशासनाने भाविकांना अधिकाधिक सेवासुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, त्यासाठी आवश्यक असलेला निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करण्यात येईल.

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर धूळ राहणार नाही यासाठी तात्पुरते डांबरीकरण करून घ्यावे. महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, कामाची गती वाढवून रस्त्यांची काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

पंढरपुरात वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्पासाठी नगर विकास विभागाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या पद्धतीने प्रशासनाने कामे करून घ्यावी. ६५ एकरचे प्लॉटचे काँक्रिटीकरण करून घ्यावे. त्या ठिकाणी वृक्ष लागवड ही करावी. पंढरपूर नगरपरिषदेसाठी स्वीपर मशीन तसेच जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आ. राजू खरे, आ. अभिजीत पाटील, आ. उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजीत आवटी, नगराध्यक्ष प्रणिती भालके, अधिकारी सचिन इथापे, प्रा. शिवाजी सावंत, महेश साठे, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पाण्याच्या दहा लाख बाटल्या मोफत

कार्तिकी यात्रेत येणाऱ्यांना भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. त्या दृष्टीने प्रशासनाने काळजी घ्यावी. शासनाकडून १० लाख पाणी बाटल्या उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचे मोफत वितरण सुरू झालेले आहे. आवश्यकता पडल्यास अधिक बाटल्या उपलब्ध करून घ्याव्यात, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सूचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.