

सोलापूर : शिवसेना नेते प्रकाश वानकर यांच्या घरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक करुन चोरीतील 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जप्त केली.
मोईन मौलानासाब दुधेकुला (वय 29, रा. नरसापूर, ता. मरपल्ली, जि. विकाराबाद, तेलंगणा) असे सराईत आरोपीचे नाव आहे. 28 डिसेंबर रोजी वानकर यांच्या देगाव येथील घरातून दोख 15 लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश सोनवणे-पाटील यांच्या पथकाने सुरू केला.
तांत्रिक बाबी तसेच इतर पुराव्यांच्या आधारे जलद तपास करुन त्यांनी मोईन दुधेकुला यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील 13 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम, एक स्विफ्ट कार, इंटरनेट राऊटर असा एकूण 20 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोईन याच्यावर हैदराबाद येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अवघ्या तीन दिवसात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून एवढी मोठी रक्कम जप्त केली.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, व.पो. निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश सोनवणे- पाटील, विजयकुमार वाळके, राहुल तोगे, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, बाळासाहेब काळे, सतीश काटे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.
गोव्याला जाऊन मौजमजा करण्याचा होता इरादा
आरोपी मोईन याने घरफोडी करुन गोव्याला जाण्याच्या तयारीत होता. मिळालेल्या पैशातून गोव्यात जाऊन मौजमजा करण्याची त्याची इच्छा असल्याचे चौकशीत त्याने सांगितले. मोईन याने घरफोडी करताना मोठी खबरदारी घेतली होती. घरातील सीसीटीव्हीकॅमेऱ्याचे डी.व्ही.आर. आणि राऊटर तो घेऊन गेला. त्याचबरोबर फिंगर प्रिंट मिळू नयेत, यासाठी हातरुमाल बांधून त्याने चोरी केली.