

पंढरपूर : पाठीशी कोणताही पक्ष नाही, कोणत्याही सहकारी संस्था नाहीत. फक्त शिक्षक, शिक्षकांसाठी केलेले काम आणि उभा केलेली चळवळ याच्या बळावर पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुणे विभागात तब्बल 77176 शिक्षक मतदार नोंदणीचे फॉर्म संबंधित शाळा व शिक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत.
शिक्षक मतदार नोंदणीचे अभियान सुरू झाले आहे. पुढच्यावर्षी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना आधी मतदार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली या पाचही जिल्ह्यात शिक्षकांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आघाडी घेतली असून, त्यांनी तब्बल 77176 शिक्षकांना मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप केले आहेत.
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ हा संपर्कासाठी भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण 58 तालुके येतात. प्रत्येक गावात शाळा आहेत. या शाळांवरती जाऊन त्यांना मतदार नोंदणीचे फॉर्म देऊन, त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन सावंत यांच्या सहकार्यांनी केले आहे.
दत्तात्रय सावंत हे गेल्या 25 वर्षांपासून शिक्षण चळवळीत सक्रिय आहेत. पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील प्रत्येक शाळांवर अनेक वेळा त्यांचे दौरे झाले आहेत. पाच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांसोबत त्यांचा वैयक्तिक स्नेह आहे. त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील 1247 शाळांमधील 22710 शिक्षक, सोलापूर 1080 शाळांमधील 18720 शिक्षक, कोल्हापूर 859 शाळेतील 13550 शिक्षक, सातारा 749 शाळेतील 11450 शिक्षक तर सांगली 690 शाळेतील 10746 शिक्षकांना फॉर्म पोहोच केले आहेत.